बल्लारी – कर्नाटकमध्ये भीक मागून जीवन जगत असलेल्या एका दिव्यांग व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गत आठवड्यात बल्लारी जिल्ह्यात घडला आहे. “बसवा गुडलक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुच्चा बस्या यांचे नुकतेच अपघाती निधन झाले.
आयुष्यभर भीक मागून ते गुजराण करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोकांची गर्दी झाली. या अंत्यसंस्काराचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
या गर्दीचे कारण बसवा यांच्या पद्धतीमध्ये दडलेले आहे. ते भीक मागत होते त्या हदगली गावातल्या रहिवाशांसाठी “बसवा गुडलक’ होते. बसवा लोकांकडून अवघा एक रुपया भीक घेत होते. विशेष म्हणजे लोकांनी जास्त पैसे घेण्याचा आग्रह करून देखील ते एक रुपया घेऊन उरलेली रक्कम परत देखील करत.
बसवा यांना एक रुपया दिल्यानंतर काहीतरी चांगले घडते, अशी श्रद्धा लोकांची तयार झाली होती. यामुळे बसवा या भागात बरेच प्रसिद्ध देखील झाले होते.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी बसवा यांचा अपघात झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले. मात्र, उपचारांना यश न आल्यामुळे शनिवारी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्याशी अनोखं नातं जोडले गेलेल्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. राजकीय व्यक्तींशी देखील बसवा बिनधास्तपणे संवाद साधायचे, असे देखील सांगितले जात.