कापूरहोळ – दोन गटांत हाणामारी, हद्दीवरुन भांडणे, बांधावरील वाद अशा घटनांतून दोन्ही बाजूच्या परस्परविरोधी तक्रारी अनेकदा दाखल होते; पण आता एकमेकांना धडा शिकण्याची आकांक्षा जबरी गुन्हा नोंदवण्यात येऊ लागली. ज्यामध्ये चक्क बलात्काराचे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या विचित्र घटनेमध्ये राजगड पोलिसांनी दोन गटातील चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नात्यातील दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.
यामध्ये एका पीडित महिलेने तिघा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ही घटना 10 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान भोर तालुक्यातील संबंधित पीडित महिलेच्या शेतामध्ये घडली आहे. शेतामध्ये उसाला पाणी देण्यास गेलेल्या या महिलेस तिच्या चुलत दिराने विनयभंग करून दोन सहकाऱ्यांसमवेत संगनमत करून गोठ्यामध्ये प्रवेश करून गोठ्याच्या दरवाजाला आतून कडी लावली व आळीपाळीने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने राजगड पोलिसांकडे दिली. यावरून राजगड पोलिसांनी संबंधित तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे संबंधित आरोपीच्या पत्नीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात दाखल केला आहे. यामध्ये 31 वर्षीय मजुरी करणाऱ्या संबंधित पीडितेने कापूरहोळ येथील कुणाल लॉज येथे व पीडितेच्या राहत्या घरी ऑक्टोबर 2020 पासून 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास राजगड पोलीस करीत असून वरील चारही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.