पुणे, (डॉ. राजू गुरव)- शालेय शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये तब्बल 3 लाख 15 हजार 456 विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसह इतर माहितीत त्रुटी आढळल्या आहेत. यात बहुसंख्य विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाल्याची गंभीर बाब उघड झालेली आहे. काही शाळांनीही विद्यार्थ्यांची माहिती भरताना गडबडी केल्या आहेत.
शाळा अनुदानासह पोषण आहार, गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप या विविध योजनांसाठी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शासनाकडून निधीचे वाटप करण्यात येत असते. विद्यार्थी संख्येवरच वर्ग, तुकड्या मान्यता व शिक्षक, कर्मचारी यांची पदनिश्चिती या सर्व कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची माहिती स्टुडंट पोर्टलमध्ये करण्याचे बंधन शाळांना घालण्यात आले आहे.
इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अचूक स्टुडंट पोर्टलमध्ये नोंदविण्याबाबतच्या सूचना शाळांना अनेकदा देण्यात आल्या होत्या. विशेष अधिकाऱ्यांच्या पथकाने शाळांनी नोंदविलेल्या माहितीची कसून तपासणी केली. त्यात बऱ्याचशा भानगडी झाल्याची बाब निदर्शनास आली. स्टुडंट पोर्टलमध्ये समान नाव असलेले विद्यार्थी एकाच शाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये अथवा वेगवेगळ्या शाळेमध्ये नोंद झाल्याचे दिसून आले आहे.
काही विद्यार्थ्यांच्या नाव, जन्मतारीख, पत्ता या माहितीतही चुका झालेल्या आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये कोणत्या शाळेमध्ये व कोणत्या वर्गामध्ये शिकत आहे याची क्षेत्रिय यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन पडताळणीही करण्यात आलेली आहे. दुबार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्यात यावी व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना सप्टेंबरमध्येच बजावले आहेत. संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना विद्यार्थी, शाळांच्या सवीस्तर याद्याही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाची शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनीही गंभीर दखल घेतली असून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत.