पुणे – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षाच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केले. त्यानुसार दि.22 जानेवारी ते 12 फेब्रुवारीदरम्यान मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे.
एमपीएससीकडून 4 सप्टेंबरला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेसाठीच्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा संयुक्त पेपर-1 हा 22 जानेवारीला, पोलीस उपनिरीक्षक पेपर-2 29 जानेवारी, सहायक कक्ष अधिकारी पेपर-2 दि. 5 फेब्रुवारी आणि राज्य कर निरीक्षक पेपर -2 हा 12 फेब्रुवारीला होणार असल्याचे एमपीएससीने संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षेची सविस्तर अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.