पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या पश्चिम रिंगरोडच्या भूसंपादनासाठी मार्गिकेच्या मोजणीचे काम वेगाने पूर्णत्वास आले आहे. मागील तीन महिन्यांत 36 गावांतील सुमारे 656 हेक्टर मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन गावांतील मोजणीचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम, असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)-केळवडे (ता.भोर) असा आहे.
पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून जाणार आहे. पश्चिम भागातील रिंगरोडची लांबी सुमारे 70 किलोमीटर इतकी आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडे पासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. पश्चिम भागातील चार तालुक्यातील सुमारे 695 हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. मावळ व भोरमधील एका गावांची मोजणी काम प्रलंबित आहे.
असा असेल मार्ग…
केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे, रहाटावडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव, मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रुक, सांगरूण, बहुली, कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरावडे, कासार आंबोली, भरे, आंबडवेट, घोटावडे, रिहे, केससेवाडी, पिंपलोळी, पाचणे, चांदखेड, बेंबड ओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से.