नवी दिल्ली – देशात शुक्रवार सकाळपासून 24 तासांत नवे 38 हजार 667 करोनाबाधित आढळले. त्यामुळे देशात सलग 48 दिवस म्हणजे सात आठवडे 50 हजारांपेक्षा कमी बाधितांची दैनंदिन नोंद झाली.
देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 3 कोटी 21 लाखांवर पोहचली आहे. त्यामध्ये सक्रिय बाधितांची संख्या 3 लाख 87 हजार 673 इतकी आहे. ते प्रमाण एकूण बाधितांच्या 1.21 टक्का आहे. तर, देशभरात आतापर्यंत 3 कोटी 13 लाखांहून अधिक बाधित बरे झाले आहेत.
ते प्रमाण एकूण बाधितांच्या 97.45 टक्के इतके आहे. आणखी 478 बाधित दगावल्याने देशातील करोनामृतांची संख्या 4 लाख 30 हजार 732 इतकी झाली आहे. देशात करोना संकट दाखल झाल्यानंतर तातडीने चाचण्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
आतापर्यंत 49 कोटींहून अधिक चाचण्या झाल्या. देशातील करोना लसीकरण मोहिमेनेही वेग पकडला आहे. त्यामुळे लसींच्या सुमारे 54 कोटी डोसचा टप्पा देशाने गाठला आहे.