चंदीगढ – अकाली दलाच्या युवानेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पंजाबच्या मोहाली सेक्टर 71 मधील कम्युनिटी सेंटरजवळ शनिवारी दुपारी घडली. विक्की मिड्डूखेडा असे गोळीबारात हत्या झालेल्याचे नाव आहे. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. भरदिवसा बेछूट गोळीबार करून हत्या झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Punjab | Youth Akali Dal leader Vicky Middukhera shot dead by unidentified people in Mohali. Details awaited.
— ANI (@ANI) August 7, 2021
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे की, 4 आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते. त्यांनी 9 राउंड फायर करून विक्की मिड्डूखेडाची हत्या केली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. जखमी अवस्थेतील विक्कीला तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीसांनी मोहालीसह चंदीगढ, पंचकुला सीमेवर नाकाबंदी केली आहे.
विक्की मिड्डूखेडा हा अकाली दलाचे नेते अजय मिड्डूखेडा यांचा लहान भाऊ आणि SOI विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता. विक्कीचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब युनिव्हर्सिटीतमध्ये विक्कीचा काही लोकांसोबत वाद सुरु होता. त्यादृष्टीने पोलिस चौकशी करत आहेत.