पुणे – बांधकाम साईटवर सापडलेली सोन्याची माळ खरी असल्याचे भासवून व्यापाऱ्याला देउन त्यांच्याककडून ३ लाख रूपये उकळणाऱ्या गुजरातमधील टोळीला खडक पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित टोळीने पुणे, ठाणे, मुंबई, गुजरामधील सोने विक्री व्यापाऱ्यांना लक्ष्य करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
प्रजापत उर्फ देवा प्रेमा राठोड (वय ३२, रा. गोसावी वस्ती, हडपसर मूळ- गुजरात) आणि नितीश उत्तम सोलंकी (वय ३१, रा. गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विक्रम प्रकाश रावल वय २७, रा. गुरूवार पेठ यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विक्रम यांचा सोने-चांदी दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. २३ जूनला आरोपींनी सोन्याची एक किलोची माळ खरी असल्याचे भासवून तपासण्यासाठी दिली होती. त्याबदल्यात त्यांनी विक्रम यांच्याकडून ३ लाख रूपये घेतले. मात्र, तपासणीदरम्यान, सोन्याची माळ खोटी असल्याचे विक्रम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार खडक पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत असताना, आरोपी काशेवाडीत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे यांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून प्रजापत आणि नितीशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.