पुणे – “रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131’च्या प्रांतपालपदी रोटरियन पंकज शाह यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 2021-22 या वर्षासाठी शाह हे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे जिल्हा व रायगड जिल्हा या अंतर्गत येणाऱ्या सर्व रोटरी क्लबचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.
शाह यांनी प्रोडक्शन टेक्नॉलॉजी विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. शिरवळ, चाकणबरोबरच मध्य प्रदेशातील इंदौर येथे असलेल्या विविध 9 कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. 2009 पासून रोटेरियन म्हणून सामाजिक कार्यात ते सक्रीय असून रोटरी क्लब ऑफ सारसबागचे अध्यक्ष म्हणून 2013-14 मध्ये त्यांनी काम केले आहे.प्रशासकीय काम व प्रशासनावरील पकड, संकटकाळातील व्यवस्थापन आणि नावीन्यपूर्ण कल्पना या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
दरम्यान, आपल्या नियुक्तीविषयी शाह म्हणाले, “रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 चा प्रांतपाल म्हणून जबाबदारी स्वीकारत असताना मला आनंद आणि जबाबदारीची जाणीवही आहे. माझ्या कार्यकाळात ग्रामीण व शहरी भागांतील प्राथमिक शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता व पर्यावरण, पाणी व वीज वापर आदी क्षेत्रांवर भर देण्यात येणार आहे.’
शाह यांना यापूर्वी अमेरिकेतील दी रोटरी फाउंडेशनच्या “सायटेशन फॉर मेरिटोरिअस सर्व्हिस’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2013-14 दरम्यान डिस्ट्रिक्ट 3131 मधील सर्वोत्तम अध्यक्ष म्हणून त्यांनी पारितोषिक पटकावले असून, रोटरीचा मानाचा “क्लब बिल्डर’ पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांनी आजवर रोटरीच्या 6 परिषदा व 5 इन्स्टिट्यूटमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.
ग्रामीण भागाचा विकास, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, ई-लर्निंग या कार्यक्रमांवर आम्ही काम करणार आहोत. शहरी भागात कचरा व्यवस्थापन व वाहतूक समस्येवर उपाय शोधून ते राबवण्याचा मानस आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ शहर, स्वच्छ गावांचा दर्जा मिळावा, यासाठीदेखील आम्ही कार्यरत असू.
– पंकज शाह, प्रांतपाल, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131