नवी दिल्ली – पोल्ट्री फार्म असणाऱ्यांना आपत्ती काळात होणाऱ्या नुकसानीबाबत योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी, आज (दि.25)केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.
बर्ड फ्लु आणि अन्य साथीच्या रोंगामुळे एकाच वेळी अनेक कोबड्यांना मारावे लागते. यामुळे पोल्ट्री मालकाचे अतोनात नुकसान होते. अशा वेळी केंद्र व राज्य शासन मिळुन काही मदत पोल्ट्री फार्म मालकांना केली जाते. मागील 15 वर्षापासून केंद्र आणि राज्य मिळून प्रत्येक कोबंड्यामागे 45:45 रूपये अशी मदत दिली जाते. ही मदत अपुरी असून ही आर्थिक मदत वाढवून किमान प्रत्येकी 100:100 रूपये असावी. अशी मागणी मंत्री केदार यांनी केली.
भारतीय गीर जातीच्या गायीवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधीक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरीत गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणुन शेतकऱ्यांना द्याव्यात जेणे करून शेतकऱ्यांच्या जोडधंदा म्हणून असणाऱ्या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल. अशी माहिती देत या गीर गायी देशात आणण्याची मागणी मंत्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.
यासोबतच सानेन या जातीच्या बकऱ्या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. त्यांना देशात आणव्या जेणे करून येथील लोकांना या बकऱ्यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही मंत्री केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली. या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजराईल येथे मोठ्या प्रमाणात आहेत.
दूध आणि भाजीपाल्यापासून बनविण्यात येणाऱ्य लोणीचा फरक समजण्यासाठी दोघांचा रंग वेगवेगळा असावा, अशी मागणीही मंत्री केदार यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.
दूधापासून तयार होणाऱ्या लोणीच्या तुलनेत भाजीपाल्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या लोणीला कमी गुंतवणूक लागते. मात्र, बाजारात आल्यावर दोघांची किंमत सारखी असते. यामुळे दुधापासून लोणी बनविणाऱ्यांना नुकसान होते. यासाठी दोन्ही लोणींचा रंग वेगळा असावा. यासह ग्राहकांनी कोणता लोणी खरेदी केले आहे हे कळण्यासाठी दोघांतील फरक स्पष्ट दिसावा. करिता लोणीचा रंग वेगळा ठेवण्याची, विनंती श्री. केदार यांनी केली.