पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचा दरवर्षी नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना विशेष सूट देण्यात येणार आहे. सलग तीन वर्ष 31 मार्चपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना यावर्षी करामध्ये 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. याबाबत महापालिका महासभेमध्ये उपसूचनेद्वारे विषय मंजूर करण्यात आला आहे.
ज्या मिळकतधारकांनी सन 2018-19 ते 2020-21 या मागील 3 अर्थिक वर्षात 31 मार्चपूर्वी विहित मुदतीत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरला आहे. अशा सर्व मिळकतधारकांनी सन 2021-22 या अर्थिक वर्षामध्ये थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराचा एकरकमी भरणा 31 मार्चपूर्वी केल्यास त्यांना प्रोत्साहनपर 2 टक्के सूट देण्यात येणार आहे.
अशाचप्रकारे ज्या मिळकतधारकांनी सलग तीन वर्ष प्रामाणिकपणे मिळकत कर भरल्यास 2 टक्के प्रोत्साहनपर सवलत निरंतर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याला महासभेमध्ये मंजुरी दण्यात आली आहे.