- सात कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या सभेत 3 शैक्षणिक भूखंड वाटपाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्राधिकरणाला संबंधित भूखंडातून एकूण 6 कोटी 99 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
पुण्यातील विभागीय कार्यालयात ही सभा झाली. विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरभ राव हे सध्या करोनामुळे होम क्वॉरंटाइन आहेत. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेत सहभाग घेतला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, नगररचना विभागाचे सहसंचालक (पुणे) अविनाश पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता सुभाष भुजबळ, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख, मनीषा कुंभार आदी उपस्थित होते.
प्राधिकरणाकडून शैक्षणिक भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. प्राथमिक शाळेसाठी तीन भूखंड देण्यास प्राधिकरण सभेने मंजुरी दिली आहे.
पेठ क्रमांक 4 मधील 3018.70 चौरस मीटरचा भूखंड असून त्यासाठी 7 हजार 130 रुपये प्रति चौरस मीटर दर निश्चित केला आहे. पेठ क्रमांक 18 येथील 3885.30 चौरस मीटर इतक्या क्षेत्राचा भूखंड असून त्यासाठी 6 हजार 640 प्रति चौरस मीटर इतका दर लागू होणार आहे. पेठ क्रमांक 40 येथील 1816.7 चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड असून त्यासाठी प्रति चौरस मीटर 12 हजार 455 इतका दर निश्चित केला आहे.
प्राधिकरणाकडून यापूर्वी वितरित केलेल्या भूखंडांसाठी भूखंडधारकाच्या मृत्यूनंतर वारसाच्या नावाची नोंद भूखंडावर दाखल करण्याचा प्रस्ताव सभेसमोर मंजुरीसाठी होता. या प्रस्तावाबाबत विभागीय आयुक्तांनी काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्या सुचनांचा अंतर्भाव करून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.