नवी दिल्ली, दि. 26 – तुम्हीदेखील विदेशातील स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांचे चाहते असाल तर आता आपल्या देशातही असेच रस्ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पुढील तीन वर्षात भारतातील रस्तेदेखील अमेरिका आणि युरोपीय देशांप्रमाणेच होणार आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
सीआयआयद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, मोदी सरकारचा यावेळचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी भारतातील रस्ते अमेरिका आणि इतर युरोपीय देशांसारखे होतील. केंद्र सरकार रोज 35 किलोमीटर रस्ता बनवत आहे. लवकरच दररोज 40 किलोमीटर रस्ता पूर्ण करण्याचे लक्ष्यही पूर्ण केले जाईल. करोना महामारीनंतर टोल कलेक्शनमध्ये सरकारने 10 हजार कोटींची वाढ केली आहे.
गडकरी म्हणाले, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुढील पाच वर्षात एक लाख कोटी रुपये जमवण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे पैसे शेयर बाजारात लावले जातील. यासाठी इंडस्ट्रीजने पुढे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यामुळे काम अधिक गतीने होईल. तसेच या फंडचा उपयोग चांगल्या सुविधांसाठी होईल, असेही ते म्हणाले.
एनएचआय पुढच्या पाच वर्षात टोल कलेक्शन ऑपरेशन आणि ट्रान्सफरअंतर्गत रस्त्यांना बाजारात उतरवत एक लाख कोटी जमा करण्याची योजना आहे. संपत्ती बाजारात उतरवणे, विक्री किंवा भाड्याने देणे ही उद्योगांसाठी चांगली संधी आहे. सोबतच सरकारलाही ठराविक रक्कम मिळण्यासाठी आणि याचा कामात वापर करण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.