- पत्रकार परिषद घेऊन केले अनधिकृत बांधकामाचे आरोप
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका नगरसेविकेवर अनधिकृत बांधकाम आणि कर थकविल्याचे गंभीर आरोप करत पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल फुगे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत.
फुगे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले की, भाजपच्या नगरसेविका भीमा फुगे यांनी भोसरीमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत त्यांनी महापालिकेला अनधिकृत बांधकामाची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच महापालिकेचे कराचे 22 लाख रुपये देखील थकीत ठेवले असून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी नगरसेविका भीमा पोपट फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी फुगे यांनी केली.
अनिल फुगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील विविध ठिकाणी असणारी अनधिकृत बांधकामे महापालिकेचा अतिक्रमण विभाग जमीनदोस्त करत आहे. एकीकडे सर्वसामान्यांची घरे पाडली जात आहेत. तर दुसरीकडे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. भोसरीमध्ये देखील नगरसेविका भीमा फुगे यांच्या पतीच्या नावावर असलेल्या इमारतीचे बांधकाम अनधिकृतपणे केले आहे.
पुणे – नाशिक महामार्गावर उड्डाणपुलाखाली शिवगंगा कॉम्प्लेक्स या इमारतीच्या वरच्या मजल्याचे बांधकाम अनधिकृतपणे वाढविण्यात आले आहे. त्याची कोणतीच परवानगी महापालिकेकडून घेण्यात आलेली नाही. तसेच वाढीव इमारतीच्या बांधकामाची माहिती महापालिकेला दिली नाही. वाढीव बांधकाम करूनही या ठिकाणी महापालिकेचा पाणीपुरवठा होत आहे. वीज पुरवठा देखील होत आहे. मात्र याची माहिती महापालिकेपासून लपवली आहे. खाली असणाऱ्या बांधकामाची नोंद आहे. मात्र विविध कराचे लाखो रुपये त्यांनी महापालिकेला दिलेले नाही. महापालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडाल्याने ही नागरिकांची देखील फसवणूक आहे. सर्वसामान्य लोकांवर कारवाई होत असताना लोकप्रतिनिधींना अभय का असा सवाल अनिल फुगे यांनी उपस्थित केला.
महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी भीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी अनिल फुगे यांनी केली. तसेच महापालिकेला फसविल्याप्रकरणी नगरसेविका भीमा फुगे यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
याबाबत नगरसेविका भीमा फुगे यांच्याशी संपर्कहोऊ न शकल्याने त्यांची याबाबातची प्रतिक्रिया समजु शकली नाही.