रेडा -इंदापूर तालुक्यात शासनाच्या आदेशाने मंगळवारी (दि. 9) तहसीलदार यांच्या आदेशानुसार सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या. यामध्ये तालुक्यातील 39 पैकी 30 ग्रामपंचायतीवर इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे.
सरपंच सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले आहेत असा ठोस दावा, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सरपंच निवडीवर भाजपने जो आंधळेपणाने दावा केला होता तो या निवडीत फेल ठरला आहे. भाजपच्या खोटे बोल पण रेटून बोला या कार्यपद्धतीवर एक प्रकारे चपराक देण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस यशस्वी झालेली आहे. असा आरोप करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये योग्य नियोजन करत हे यश पक्षाने प्राप्त केले आहे.