देहूगाव – गेल्या दोन महिन्यांपासून श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने हंगामी कामगार हतबल झाले आहे.
देहूगाव ग्रामपंचायतीमध्ये 24 कायम, तर हंगामी 30 कामगार आहेत. यामधील 34 कामगारांच्या वेतना पोटीसाठी प्रशासनाला प्रतिमहा सुमारे साडेचार लाख रुपये द्यावे लागतात. ग्रामपंचायतीची नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने काही हंगामी कामगारांना घरभाडे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नगरपंचायतीच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील काही प्रतिनिधींनी कामगारांचे पगार लवकरात लवकर करावेत यासाठी निवेदनेही दिली आहे, तर काही कामगारांनी प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली.
लॉकडाऊनमुळे ग्रामपंचायतीकडे महसूल जमा झाला नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात झालेले खर्च भागविताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होताना कामगारांचा पगार देण्याएवढी रक्कम शिल्लक नव्हती. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने घरपट्टी व इतर कर जमा करून घेण्यास सुरवात केली.
कामगारांच्या पगारासाठी रक्कम उपलब्ध झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यावर कारभार प्रशासकांकडे आला. मात्र हा कारभार हस्तांतरीत करण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवकांनी वेळ लावला. कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर देहूरोड येथील राष्ट्रीय बॅंकेत खाते उघडण्यात आले. मात्र बॅंकेकडून अद्याप नगरपंचायतीला धनादेश मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार करण्यामध्ये तांत्रिक अडचण आल्याचे प्रशासक मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.