नवी दिल्ली – ट्रायल कोर्टाच्या खोट्या निकालाची प्रत सर्वोच्च न्यायालयात सादर करून केवळ दंडाची रक्कम भरून एका आरोपींने स्वत:ची कारागृहातून सुटका करून घेतली. हा फसवणुकीचा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर न्यायालयाने संबंधीत आरोपी एस शंकर याला नोटीस जारी करून सुटकेचा आदेश रद्द का केला जाऊ नये अशी विचारणा त्याच्याकडे केली आहे.
एस शंकर हा सरकारी कर्मचारी असून त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ट्रायल कोर्टाने सन 2000 साली निकाल दिला असून त्यात आपल्या आशिलाला कारावासाची नव्हे तर केवळ एक हजार रूपये दंडाची शिक्षा झाली आहे. या निकालाचा आंध्र हायकोर्टाने चुकीचा अर्थ लावून त्यांना तशी कारावासाची शिक्षा दिली आहे.
पण ट्रायल कोर्टाने आपल्या आशिलाला कारावासाची शिक्षाच दिली नव्हती असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी करून ट्रायल कोर्टाच्या निकालाची खोटी प्रत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. त्या आधारे सुप्रिम कोर्टाने सदर आरोपीला हजार रूपये दंड वसूल करून सोडून द्यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
तथापि फसवुकीची बाब लक्षात आल्यानंतर या साऱ्या प्रकाराची सुप्रीम कोर्टाच्या सेक्रेटरी जनरलकडून चौकशी करण्यात आली असता आरोपी शंकर याने कोर्टाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधीत आरोपीला नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याला चार आठवड्यात त्याला उत्तर देण्याचा आदेश देण्यात आला आहे.