वेल्हे -करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्राथमिक शाळा सध्या बंद असल्या तरी पुणे जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम व डोंगरी भाग असलेल्या वेल्हे तालुक्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा “राजगड पॅटर्न’ साकारत आहे. वेल्हे पंचायत समितीचे नव्याने पदभार घेतलेले गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांच्या संकल्पनेतून “एकच धोरण, गुणवत्तेचे तोरण’ हे ब्रीद घेऊन हे नाविन्यपूर्ण उपक्रम साकारत आहे.
कमलाकांत म्हेत्रे हे वाई (जि. सातारा) येथे गटशिक्षणाधिकारी या पदावर असताना “एव्हरेस्ट’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्याची यशस्विता म्हणून पाचवी शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परीक्षेत वाई तालुका राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच धर्तीवर वेल्हे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून सभापती दिनकर सरपाले, उपसभापती सीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, पंचायत समिती सदस्य संगिता जेधे, अनंता दारवटकर आणि गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण शिळीमकर, सर्व केंद्रप्रमुख, उपक्रमशील शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक, विषयसाधन व्यक्ती यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून अभ्यासक्रम निर्मितीसाठी शुक्रवारी (दि. 4) पंचायत समितीच्या नवीन सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वेल्हे तालुक्यात 144 प्राथमिक शाळा अंतर्गत 330 शिक्षक कार्यरत असून 3 हजार 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 79 शाळा या 20 पटाच्या आतील असल्याने स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन शाळा सुरू करता येईल का? यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दळणवळणाच्या व संपर्काच्या दृष्टीने दुर्गम भाग असल्याने करोनाकाळात ऑनलाइन शिक्षण घेता येणे तालुक्यातील विद्यार्थ्यांना शक्य नसून ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण शिळीमकर, केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू, दीपक नलावडे, पोपट नलावडे, प्रवीण इंदलकर, कौशल्या पवार, मुल्ला, रंगनाथ भालेराव, तुकाराम साखरे, विषय साधन व्यक्ती इंद्रायणी गायकवाड, विषयतज्ज्ञ उध्दव चाटे, मुख्याध्यापक भरत शेंडकर, तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.
2040चा वेल्हे तालुका घडविण्याची जबाबदारी आज माझ्या शिक्षकांवर आहे. वेल्हे तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असला तरी 90 टक्के शिक्षक हे वयाने चाळीशीच्या आतील असल्याने तरुण शिक्षकांचा तालुका असणे ही जमेची बाजू आहे. विद्यार्थ्यांना
दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षक उत्सूक असून, त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होणार आहे.
-कमलाकांत म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी वेल्हे
असा असेल हा राजगड पटर्न
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पटर्न लागू असणार आहे
भाषा, गणित व इंग्रजी विषयांचे मासिक अभ्यासक्रम तालुक्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून तयार करण्यात येणार
वेल्हे बीट भाषा, करंजावणे बीट गणित, पानशेत बीट इंग्रजीचे शास्त्रशुध्द अभ्यासक्रमाची निर्मिती करणार
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशेष टीमची नियुक्ती केली असून नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी निश्चित
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून अंमलबजावणी होणार
महिनाअखेरीस पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार
स्वाध्याय पचा 100 टक्के नोंदणी करून प्रभावी वापर करणार
‘एक गाव, एक बालरक्षक’ च्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणणे