मुंबई – भारतीय नौदलासाठी एमएच-60 रोमियो हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. अमेरिकन कंपनी लॉकहिड मार्टिनने नुकताच एमएच-60 रोमियो या हेलिकॉप्टरचा फोटो शेअर केला होता.
हे हेलिकॉप्टर खास नौदलासाठी डिझाईन केलं जात आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यात आणि ते त्या पाणबुड्या नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक असे रडार आहेत ज्याद्वारे खोल समुद्रात लपलेल्या पाणबुड्या शोधता येतील आणि त्यांना लक्ष्य करुन त्या उद्वस्त करता येतील.
या हेलिकॉप्टरमध्ये हेल्प फायर मिसाईल्स, एमके-54 टॉरपॅडो (पाणतीर) आणि रॉकेटदेखील आहे. ही हत्यारं शत्रूच्या युद्धनौका नष्ट करण्यास सक्षम आहेत. एमएच-60 रोमियो हेलिकॉप्टर वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. जेणेकरुन एमएच-60 रोमियो हेलिकॉप्टरमध्ये एमएच-60 बी आणि एमएच-60 एफ हेलिकॉप्टर्सच्या फिचर्सचा समावेश करता येईल.
हिंदी महासागरात चीनचं सामर्थ्य वाढलं आहे. चीनची वाढती ताकद पाहता भारताने अमेरीकन कंपनी लॉकहीड मार्टिनशी संपर्क साधून या हेलिकॉप्टरसाठीचा करार केला आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीला 24 हेलिकॉप्टर बनवण्याची ऑर्डर दिली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात अपग्रेडेड हेलिकॉप्टर असणार आहे. यामध्ये असे काही फिचर्स आहेत, जे यापूर्वी कोणत्याही लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये पाहायला मिळाले नव्हते. अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर आधीपासूनच करत आहे.