“बाहुबली’ फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीने शनिवारी आपला वाढदिवस साजरा केला. स्वीटी शेट्टी हे तिचे खरे नाव अनेकांना माहित नसेल. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिला या नावानेच ओळखले जात होते.
अनुष्काने फिल्मी प्रवासाची सुरूवात 2005मध्ये “सुपर’ या तेलुगू चित्रपटातून केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर ती एसएस राजामौली यांच्या “विक्रमार्कुदु’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती.
2009मध्ये प्रदर्शित झालेल्या “अरूंधति’मध्ये अनुष्काने डबल रोल साकारला होता. या भूमिकेलाही चाहत्यांनी भरभरून दाद दिली. तसेच या भूमिकेसाठी तिला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्डदेखील मिळाला. यानंतर “वेदम’साठी तिला दुसऱ्यांदा बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुष्काला “रुद्रमादेवी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तिसऱ्यांदा फिल्मफेयर पुरस्कार मिळवून दिला.
यानंतर एसएस राजामौली यांच्या “बाहुबली-1′ आणि “बाहुबली-2′ या चित्रपटाने तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. “देवसेना’च्या भूमिकेमुळे तिचा चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. अभिनेता प्रभाससोबत तिची ऑन स्क्रीन जोडीला खूपच पसंती मिळाली.