पुणे –देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहे. मात्र, देशात एमबीबीएस प्रवेशासाठी 88 हजार जागा आणि पात्र विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 9 लाख आहे. “नीट’ उत्तीर्ण होऊनही एमबीबीएसला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असते. त्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर देशातील वैद्यकीय शिक्षण अबाधित ठेवण्यासाठी व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढविणे आवश्यक बनले आहे.
भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील “नीट’ प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. “नीट’च्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाख 97 हजार 435 बसले होते. त्यापैकी 8 लाख 70 हजार 74 विद्यार्थी एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. पण देशात मेडिकलच्या 88 हजार 370 जागा आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक जागा अशा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत, जिथे शिक्षण स्वस्त आहे. “नीट’मध्ये चांगले गुण मिळाले तरच तिथे प्रवेश घेता येतो. मात्र, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षणाचा खर्च जवळपास 50 लाखांच्या पुढे आहे. खासगी महाविद्यालयीाल शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मेडिकलच्या जागा वाढविणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी पंतप्रधानांसमोर मांडले वास्तव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिम्बायोसिसच्या “आरोग्यधाम’चे उद्घाटन रविवारी उत्साहात झाले. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या समोर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शां. ब. मुजुमदार यांनी “देशातील शिक्षण महागडे बनले आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी परेदशात जात आहेत. त्यावर सरकारने उपाययोजना शोधायला हवा,’ असे विचार मांडले. पंतप्रधानांना एका पुणेकरांनी ही बाब निदर्शनास आणून सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षणाचे वास्तव मांडले. त्यावर वैद्यकीय शिक्षणावरील होणारा खर्चाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला.
युक्रेनकडे कल का?
युक्रेन देशात भारतातील 18 हजार 36 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे अडकलेले विद्यार्थी देशात आणण्यासाठी धावपळ सुरू आहे. दरम्यान, युक्रेन देशात वैद्यकीय प्रवेशासाठी “नीट’सारखी प्रवेश परीक्षा नसून, थेट प्रवेश दिला जातो. तेथील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च 20 ते 22 लाखांपर्यंत आहे. येथील वैद्यकीय शिक्षणानंतर जगात कुठेही प्रॅक्टिस करण्याची मुभा, या कारणाने युक्रेन देशातील शिक्षणाकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत.