पुणे -जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 78 लाख 95 हजार 894 झाली आहे. जिल्ह्यता सर्वांत मोठा मतदारसंघ हा चिंचवड असून या मतदारसंघात 5 लाख 39 हजार मतदार आहेत. तर सर्वांत लहान मतदारसंघ हा पुणे कॅन्टोन्मेंट असून या मतदारसंघात 2 लाख 81 हजार मतदार आहेत.
जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर ही मतदार यादी अधिक अचुक करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीत मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्यांमध्ये बदल आदी कामे करून ही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी आवाहन…
नवीन मतदार नोंदणी, मयत, स्थलांतरित मतदार तसेच दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरूस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान यासाठी आवश्यक नमुना अर्ज भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) द्यावेत.
तसेच या सर्व सुविधा ऑनलाइनरित्या उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा पर्वती विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे. दरम्यान, छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार मतदार यादीवर 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.