उरूळी कांचन येथील प्रकार : माढ्यातील ठगाविरूद्ध गुन्हा दाखल
लोणी काळभोर- पेट्रोलपंप परवाना काढण्यासाठी 7 लाख रूपये घेवुनही काम न करता उडवाउडवीची उत्तरे देवून दिलेल्या रकमेचे दिलेले चेक बाउंस झाले म्हणून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संतोष बबन कांचन (वय 48, रा. उरूळीकाचन, तेज प्लॅटिनम सोसायटी, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारत विश्वनाथ देशमुख (रा. पडसळी, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचन हे शेती व्यवसाय करतात. शेतमालास बाजारभाव नसल्याने तसेच शेती करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे त्यांनी जानेवारी 2018 मध्ये आपल्या ऊरूळी कांचन येथील गट नंबर 1110 मध्ये पेट्रोलपंप टाकण्याचे ठरवले. त्यासाठी लागणारी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्यांचे मित्र बाळासाहेब सोनवणे यांनी त्यांना सांगीतले की, भारत देशमुख हे पेट्रोल पंपाच्या परवान्यासाठी सर्व कागदपत्रे काढून देतात. त्यामुळे कांचन यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या कामासाठी एकूण 20 लाख रूपये खर्च सांगितला.
शेवटी हे काम 15 लाख रूपयांत करण्याचे ठरले. झाले. यावेळी ऍडव्हॉन्स 7 लाख व काम झाल्यानंतर 8 लाख रूपये देण्याचे ठरले. त्यावेळी साक्षीदार म्हणून कांचन यांचे नातेवाईक प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. दि. 21 फेब्रुवारी 2018 रोजी कांचन यांनी देशमुख यांच्या बॅंक खात्यावर 5 लाख रूपये आरटीजीएस केले. रोख 2 लाख रूपये व नातेवाईक गायकवाड यांच्या समक्ष दिले. पैसे ताब्यात आल्यानंतर तुमचे काम 3 ते 4 महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगितले. कांचन यांनी अधूनमधून संपर्क साधला असता काम न झाल्याचे संदेश येत होते.
आज ना उद्या काम होईल म्हणून कांचन यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतू यानंतर देशमुख उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे देशमुख हा फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. कांचन यांनी त्याच्याकडून 2 व 5 लाख रुपये रकमेचे धनादेश घेतले. ते वटवण्यासाठी बॅंकेत टाकले असता बाउंस झाले. ही बाब त्यांना सांगितली असता त्याने पुन्हा 3 व 5 लाखाचे धनादेश दिले. तेही बाउंस झाले. त्यामुळे पुन्हा त्याने दि. 14 जून रोजी 3 लाख रूपयांचा आणि दि. 25 जून रोजी 2 लाख रूपयांचा धनादेश दिला. तेही बाउंस झाल्याने कांचन यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.