पेठ- कारेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांच्या वतीने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या वतीने कारेगाव येथील मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला.
सातगाव पठार भागातील कारेगाव येथे अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून एकोप्याने गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आदर्श सामुदायिक विवाह सोहळा राबविणारे हे गाव आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सरपंच विलास घेवडे, पोलीस पाटील विशाल कराळे, महादेव कराळे, ज्ञानेश्वर कराळे, नानाभाऊ कराळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.