बीजिंग – चीनमधील सिचुआन प्रांताला आज भूकंपाचा 6.1 क्षमतेचा जोरदार धक्का बसला. यामुळे झाल्लाय पडझडीत किमान तिघेजण गंभीर जखमी झाले. तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. संध्याकाळी 5 वाजता यान शहराच्या लुशान भागाला हा भूकंपाचा धक्का जाणवला.
भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांशाच्या 30 अंश उत्तरेकडे आणि रेखांशाच्या 102 अंश पूर्वेकडे जमिनीखाली 17 किलोमीटर अंतरावर होता, असे “चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर’ने म्हटले आहे. भूकंपाच्या मुख्य धक्क्यानंतर अनेक आफ्टरशॉक जाणवले, असेही संस्तेने आपल्या निरीक्षणामध्ये म्हटले आहे.
भूकंपानंतर 3 मिनिटांनी बोक्सिंग भागालाही 4.5 क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. सिचुआनची राजधानी चेंगडू आणि चोंगकिंग नगरपालिकेपर्यंतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. चोंगकिंग पालिकाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी बचाव आणि मदत कार्यात सक्रिय झाले आहेत. लगतच्या गुइझोउ, युन्नान प्रांत आणि चोंगकिंग नगरपालिकेचे बचाव पथक मदतीसाठी तयार आहेत. अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेसेवा तात्काळ स्थगित केली.