नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी सत्येंद्र जैन यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. जनतेला मोफत उपचाराचे मोहल्ला क्लिनिक्स हे मॉडेल दिल्याबद्दल संपूर्ण देशाला जैन यांच्याविषयी अभिमान वाटायला हवा, असे केजरीवाल यांनी म्हटले. एवढेच नव्हे तर, जैन यांना पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जैन यांना नुकतीच मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली. त्यावरून भाजप आणि कॉंग्रेसने केजरीवाल आणि त्यांच्या आप सरकारला घेरले आहे. त्या पक्षांनी जैन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, जैन यांच्या विरोधातील प्रकरण खोटे आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याची भूमिका केजरीवाल आणि आपने घेतली आहे. ती कायम ठेवत केजरीवाल यांनी बुधवारी जैन यांचे जोरदार समर्थन केले.
सीबीआयने याआधीच जैन यांना क्लीन चिट दिली आहे. ईडीच्या चौकशीतूनही त्यांच्या विरोधात काही आढळणार नाही. जैन हे अतिशय प्रामाणिक आणि देशभक्त व्यक्ती आहेत. त्यांच्या संकल्पनेतून मोहल्ला क्लिनिक्स हे आरोग्यविषयक मॉडेल साकार झाले.
जगभरातील लोक त्या क्लिनिक्सला भेट देत आहेत, असे केजरीवाल येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी मांडलेल्या भूमिकेतून ते जैन यांचा राजीनामा घेण्याच्या मुडमध्ये नसल्याचे स्पष्ट होत आहे.