नवी दिल्ली (वंदना बर्वे)- नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने प्रत्येक मतदारसंघात पाच हजार ‘मुस्लिम मोदी मित्र’ बनविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी अल्पसंख्यक विभाग कामाला लागला आहे. भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या आगामी निवडणुकीपर्यत प्रत्येक मतदारसंघात पाच हजार मुस्लिम मित्र बनविण्याची भाजपची योजना आहे.
भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले असतानाच मुस्लिमबहुल जागांवरही भाजप विरोधकांना आव्हान देण्याची रणनीती आखत आहे. त्यासाठी पक्ष अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजातील मोदींना मित्र बनवत आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदींना पाच हजार मित्र बनवण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येकाने फक्त 10 मते मिळवायची आहेत. अशा पध्दतीने प्रत्येक मतदारसंघात 50 हजार मते मिळविली जाणार आहे.
भाजपने मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे अशा 65 मतदारसंघाची ओळख पटविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही काळात विविध मुस्लिम समुदायांशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: पसमांदा या मागास मुस्लिम समुदायाचा उल्लेख करावा लागेल. अलीकडेच मोदी यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत या वर्गाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
भाजपने लोकसभेचे 65 मतदारसंघ शोधून काढले आहेत जेथे अल्पसंख्याक लोकसंख्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. या जागांवर मोदी मित्र बनवले जात आहेत. हे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, तर विविध क्षेत्रातील सामान्य लोक आहेत. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या घोषणेशी जे सहमत आहेत त्यांना मोदी मित्र बनवून प्रमाणपत्र दिले जात आहे.
आतापर्यंत 36 हजार मोदी मित्र बनविण्यात आले आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी एक प्रभारी आणि 30 सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक सहप्रभारीला तीस मोदी मित्र बनवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 900 आणि लोकसभा मतदारसंघात पाच हजार मोदी मित्र बनवण्याची तयारी सुरू आहे.
प्रत्येक मोदी मित्राने आपल्या भागात एक बैठक आयोजित करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन समाजाशी संवाद साधतील. ते शासनाच्या योजनांची माहिती देतील आणि ज्या योजना त्यांना मिळू शकल्या नाहीत त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय प्रस्थापित करतील. अशा प्रकारे लोकसभेच्या प्रत्येक जागेवर भाजप उमेदवाराला 50,000 मुस्लिम किंवा अल्पसंख्याक मते मिळू शकतात. भाजपला ही रणनीती यशस्वी झाल्यास मुस्लिमबहुल जागांवरही ते विरोधी पक्षांना मोठे आव्हान उभे करू शकेल.