पारनेर – पारनेर शहराचा विकास करण्यासाठी आपण योगदान देऊ, असा नगरपंचायत निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून आ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून शहरात अद्यावत बगीचासाठी ५ कोटींचा निधी पर्यटन विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. आ. नीलेश लंके यांनी ही माहिती दिली.
शहरातील मुले तसेच वृद्ध नागरिकांसाठी अद्यावत बगीचाची मागणी आ. लंके यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन आ. लंके यांनी नगरपंचायत प्रशासनास पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर आ. लंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यामार्फत पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश येऊन बगीच्याच्या कामास बुधवार दि. २० डिसेंबर रोजी प्रशासकिय मान्यता देण्यात आली. लवकरच निविदा प्रक्रिया पार पडून या कामास सुरूवात होणार आहे.
पारनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जिव्हाळयाचा आहे. वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर शहरवासियांसाठी शाश्वत पाणी योजना राबविण्याचाही शब्द आ. लंके यांनी दिला आहे. पाणी योजना मंजूर झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी येणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. पाणी योजनेचा प्रस्तावही नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला असून त्याच्या मंजुरीसाठी आ. लंके हे प्रयत्नशिल आहेत.
हिवाळी अधिवेशनात देवीभोयरे फाटा ते खडकी (ता. नगर) या रस्त्याच्या कामासाठी ३६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ताही पारनेर शहरातून जात असून पारनेर शहराची हद्द ते सुपा या दरम्यानचा हा रस्ता चारपदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी आ. लंके यांनी पाठपुरावा केला होता. या चारपदरी रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजक तसेच विजेचे खांबही बसविण्यात येणार आहेत.