पिंपरी, दि. 16 – नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांकडून साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 14 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत डांगे चौक थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरदीन फिरोज खान (वय 23, रा. चिंचवड) याला अटक केली आहे.
फिर्यादी व त्यांचे मित्र गौरव होवाळे व विनय भदरे या तिघांना आरोपीने तो सायबेज या कंपनीचे डायरेक्टर पदावर असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्याकडून ईमेलद्वारे दोन लॅपटॉप, आयपॅड, सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाइल, दोन आयफोन, वन प्लस मोबाइल व रोख रक्कम 55 हजार असा एकूण 5 लाख 63 हजार 448 रुपयांचा ऐवज घेतला. सर्व वस्तू व पैशांचा अपहार करून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली.