मुंबई – इलेक्ट्रिक वाहनाबाबत ग्राहकांमध्ये जागृती होत आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनाला चालना दिली जात असल्यामुळे आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढेल. त्याचबरोबर तीन ते चार वर्षांमध्ये भारतात नवी 48,000 चार्जिंग स्टेशन उभारली जाण्याची जाण्याची शक्यता आहे.
यासाठी तब्बल 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सर्वसमावेशक अभ्यास करून ईक्रा या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की बसबरोबरच दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहे. सध्या भारतामध्ये केवळ मोठ्या शहरातील काही भागांमध्ये 2 हजार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत.
अर्थात ही चार्जिंग स्टेशन भारतातील मोठी लोकसंख्या पाहता पुरेशी नाहीत. त्यामुळे खासगी क्षेत्राबरोबरच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता आहे. ईक्रा या संस्थेचे उपाध्यक्ष समशेर दिवाण यांनी सांगितले की विकसित देशांपेक्षा भारतात इलेक्ट्रिक वाहनासाठीच्या पायाभूत सुविधा कमी आहेत. त्या वाढविण्यासाठी आवश्यक वेगाने प्रयत्न चालू आहेत.