झोपडपट्ट्यांत पब्लिक टेलिफोनचे उद्घाटन
पुणे, दि. 14 – “शहरातील झोपडपट्ट्यांत सार्वजनिक टेलिफोन केंद्रे उघडण्याचा पुणे टेलिफोन विभागाचा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. यामागे या विभागाचे प्रमुख व्ही. एन. वऱ्हाडकर यांचा जो दृष्टिकोन आहे तोही अभिनंदनीय आहे’,
असे उद्गार पुण्याचे महापौर शांताराम दिवेकर यांनी तीन झोपडपट्ट्यांत तीन सार्वजनिक टेलिफोन केंद्राचे उद्घाटन समारंभ प्रसंगी काढले. पुण्यातील येरवडा विभागातील नागपूर चाळ, वडारवाडी आणि जनवाडी या तीन झोपडपट्ट्यांत ही केंद्रे आज उघडण्यात आली.
ब्रिटिश राजकन्येचा विवाह पार पडला
लंडन – आज ब्रिटिश राजकन्या ऍन (23) हिचे लग्न कॅप्टन मार्क फिलिप्स याचे बरोबर झाले. त्याचे वय 25 असून तो राजघराण्यातील नाही. तिला राणी एलिझाबेथने नवीन नाव दिलेले नाही.
राज्यातील विद्यापीठांना समान कायदा लागू करणारी 6 बिले
नागपूर – आज विधानसभेत शिक्षणमंत्री नाम जोशी यांनी राज्यातील विद्यापीठांना समान कायदा लागू करण्यासाठी 6 बिले मांडली. मुंबई, पुणे, नागपूर, शिवाजी, मराठवाडा व एसएनडीटी या विद्यापीठांचा समावेश आहे.
या बिलान्वये विद्यापीठाच्या समित्यांत विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. या बिलाचा उद्देश असा आहे की, राज्याच्या सर्व भागांतील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सवलती, अध्यापन कार्यात चांगल्या शिक्षकांची सोय व अधिक कार्यक्षम प्रशासन यांचा फायदा मिळावा.
ब्रिटिश राजकन्येला इंदिराजींचा आहेर
नवी दिल्ली – ब्रिटिश राजकन्या ऍन हिच्या विवाहाप्रीत्यर्थ पंतप्रधान इंदिरा गांधींनी संगमरवरी टेबल आहेर पाठविला आहे. टेबलावरील चित्रकृती ताजमहालातील संगमरवरी तक्त्याप्रमाणे आहे.