राजकीय विरोधकांविरुद्ध “मिसा’चा वापर होणार नाही
नवी दिल्ली, दि. 13 – देशातील एकंदर परिस्थितीमुळे आणीबाणी उठविता येणे शक्य नाही मात्र अंतर्गत सुरक्षा कायद्याचा (मिसा) वापर यापुढे फक्त समाजविरोधी व देशद्रोही घटकांविरुद्धच केला जाईल. न्याय्य राजकीय कृती करणाऱ्यांच्या विरुद्ध त्याचा वापर केला जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिले. “मिसा’च्या अंमलबजावणीच्या प्रश्नावर राज्य सरकारांशी विचार करून केंद्र सरकार निर्णय घेईल, असे त्या पुढे म्हणाल्या.
मोरारजींचे उत्तर
मोरारजीभाईंनी पाठविलेल्या उत्तरात सरकारच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला असून आणीबाणी बेमुदत काळापर्यंत जारी राहू नये असे सुचविले आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा ती ताबडतोब जारी करता येईल, असे ते
पुढे म्हणाले.
अफगाणिस्तानचा पवित्रा आक्रमक
नवी दिल्ली – अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे, अशी तक्रार पाकिस्तानच्या संरक्षण व परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री अझीझ अहमद यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस वालडहाईम यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. बलुचिस्तानातील गनिमांना अफगाणिस्तान प्रशिक्षण देत आहे व शस्त्रे पुरवीत आहे, असा आरोप अहमद यांनी या पत्रात केला आहे.
रशियाची इस्रायलशी गुप्त बोलणी
तेलअवीव – रशियाने गुप्तपणे इस्रायलशी बोलणी सुरू केली आहेत, असे समजते. मध्यपूर्वेतील पेचप्रसंग सोडविण्याचा एक प्रयत्न म्हणून रशियाने हे पाऊल उचलले आहे. जीनिव्हा परिषद पुन्हा बोलवावी असा प्रस्ताव रशियाने मांडला आहे. जीनिव्हा येथे जर तडजोड होऊ शकली तर रशिया इस्रायलशी पुन्हा राजनैतिक संबंध सुरू करील.