भारतीयांबद्दल चिनी लोकांना प्रेम वाटते?
कलकत्ता, दि. 31 – चीनचे उपमंत्री चाओ हुंग हे जागतिक टेबल टेनिस सामन्यांसाठी येथे आले आहेत. 48 चिनी खेळाडू या संघात आहेत. मुलाखतीत ते म्हणाले, भारतीय जनतेबद्दल चिनी जनतेला नेहमीच आपुलकी वाटते. आमचा संघ येथे सामन्यांत भाग घेण्यासाठी आला आहे. परंतु भारतीय जनतेबद्दल वाटणाऱ्या मित्रभावामुळेच प्रामुख्याने आम्ही येथे आलो आहोत. खेळात भाग घेणे गौण भाग आहे.
शास्त्रज्ञांनी देवघेव हवी
मद्रास – विषमता व दारिद्य्र नष्ट करावयाचे असेल तर शास्त्रज्ञान व तंत्रज्ञान यांची देवघेव करण्यात आली पाहिजे व त्याचवेळी गुप्तता काढून टाकली पाहिजे, असे विचार भारतीय अणुसंशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. सेठना यांनी येथे व्यक्त केले.
सामान्यांचे प्रश्न अद्यापही संसदेला सोडविता येतील
पुणे – हिंदुस्थानातील लोकशाहीला सामाजिक प्रगती व समतेची जोड दिली तर संसदेमार्फत सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे अद्यापही शक्य आहे, असे विचार खासदार नानासाहेब गोरे यांनी वसंत व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले.
अमेरिकन शस्त्रनिर्यातीमुळे जगात तणाव वाढतात
वॉशिंग्टन – अमेरिकन सीनेटर विल्यम प्रॉक्समायर यांनी अमेरिकन सरकारच्या शस्त्र निर्यातीवर टीका केली आहे. शस्त्र निर्यातीबाबत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. युद्धमान राष्ट्रांना शस्त्र संपन्न करण्यापेक्षा शस्त्र स्पर्धा विरहित टापू निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः आफ्रिका, दक्षिण अमेरिका, इंडोचायना भागात शस्त्रांच्या साधनांचा अभाव निर्माण करून तणाव कमी केला पाहिजे.