समाजवादी पक्ष जनआंदोलन देशभर पसरविणार
कोझिकोड, दि. 2 – संपूर्ण देशात जनआंदोलन प्रसारित करणे हे समाजवादी पक्षाचे नवे राजकीय धोरण असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी कालिकत प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. फर्नांडिस पुढे म्हणाले,
समाजवादी पक्षाच्या अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय महत्त्वाचे असून ते दूरगामी परिणाम करणारे ठरतील. बिहारमधील आंदोलनानंतर कॉंग्रेसला पुरोगामी असा पर्याय निर्माण होण्याची क्रिया अधिक जलद होणार आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांची पत जनतेच्या दृष्टीने कमी झाली असल्याचे फर्नांडिस यांनी मान्य केले.
मतदार याद्यांचे काम पुण्यात सुरू
पुणे – शहरातील 75 वॉर्डातील मतदारांच्या नवीन याद्या तयार करण्याचे कामास सुरुवात झाल्याचे कळते. विभागवार याद्या तयार करण्यासाठी वेगळा विभाग सुरू करण्यात आला असून नवीन मतदारांची नोंदणी व जुन्या मतदारांच्या नावाची तपासणी सुरू झाली आहे. मध्यावधी निवडणुका व सदर यादीची तयारी यांचा संबंध लावला जात आहे.
नियोजन मंत्रालयाची सूत्रे इंदिराजींनी स्वतःकडे घेतली
नवी दिल्ली – पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नियोजन मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्याचे राष्ट्रपती भवनातून काढलेल्या पत्रकात जाहीर करण्यात आले. उद्योगमंत्री श्री पै यांचेकडील सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे खातेही पंतप्रधानांनी आपल्याकडे घेतले आहे.
श्रीमती गांधी यांनी नियोजन मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यावर आता मंत्रालयाची फेररचनाही लवकरच करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. तसेच नियोजन मंडळावरही आणखी जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे. डॉ. मनमोहनसिंग यांचा नियोजन मंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.