विधानसभा त्वरित रद्द होणे अशक्य
नागपूर, दि. 2 – राज्य विधानसभा त्वरित रद्द होण्याची शक्यता मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांनी आज फेटाळून लावली. ते पुढे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होतील. विधानसभा विसर्जनाची बाहेर चर्चा चालू आहे.
परंतु त्वरित विसर्जन होईल, असे आपल्याला वाटत नसल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच नियोजित निवडणुका होण्याबाबत आपल्याला विश्वास वाटतो. केंद्रात सत्ताबदल झाला असला तरी राज्यात त्याचा परिणाम होणार नाही.
पौंड-डॉलरचे संबंध संपुष्टात आले
लंडन – पौंड स्टर्लिंगचे अमेरिकन डॉलरबरोबर असलेले संबंध ब्रिटीश सरकारने आज संपुष्टात आणले.
पौंडाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आज पौंड स्टर्लिंगच्या खरेदीचे दर बदलले आहेत. नवीन बदलानुसार पौंडाच्या तुलनेत रुपयांचे 3.6 टक्के अवमूल्यन झाले आहे. एक पौंड बरोबर 15.70 रुपये हे प्रमाण आता अस्तित्वात राहील.