इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाकिस्तानी रुपयाचे 30 टक्क्यांपेक्षा अधिक अवमूल्यन झाले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हे सर्वात मोठे रुपयाचे अवमूल्यन ठरले आहे. पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 2018 मध्ये 128 रु. इतके होते. या रुपयाचे अवमूल्यन 2021 मध्ये डॉलरच्या तुलनेत 177 रु इतके झाले. म्हणजेच गेल्या 40 महिन्यांच्या काळात पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 30.5 टक्क्यांनी घसरले आहे.
यापूर्वी 1971 च्या युद्धाच्या वेळी जेव्हा तत्कालीन पूर्व पाकिस्तान अर्थात आताच्या बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला तेव्हा पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 58 टक्क्यांनी घसरले होते. तेव्हा पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 4.60 रु. वरून 11.10 रु इतके झाले होते.चलनाचे हे अलीकडील अवमूल्यन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पूर्वीच्या कृतींद्वारे ठरवले होते, त्याचा आर्थिक मूलभूत गोष्टींशी काहीही संबंध नाही, असे निरीक्षकांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे वित्तीय धोरण चलनविषयक आणि विनिमय दर धोरणांच्या अधीन झाल्यामुळे आर्थिक धोरणनिर्मिती पूर्णपणे मोडीत निघाली होती, असे माजी आर्थिक सल्लागार डॉ. अशफाक हसन खान यांनी सांगितले. चलनविषयक ताठरता आणि विनिमय दरातील घसरणीमुळे महागाई, सार्वजनिक कर्ज आणि कर्ज सेवांचे मूल्यही वाढले, असेही त्यांनी सांगितले.