श्रीगोंदा -तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून चोरट्यांनी जवळपास तीस लाखांची रोकड लंपास केली. ही घटना काल मध्यरात्री घडली. दरम्यान, लोणी व्यंकनाथ येथील हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काल रात्री चोरट्यांनी सुरुवातीला त्या भागातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे हाताने फिरवून त्यांची दिशा बदलली. रोकड ठेवण्याचे लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने तोडून त्यातील तीस लाखांची रोकड अज्ञातांनी लंपास केली. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलीस पाटील मनेश जगताप यांनी पोलिसांत खबर दिली.
मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी या एटीएम मशीनमध्ये 32 लाख रुपयांची रोकड टाकली होती. यापैकी सुमारे दोन लाखांची रोकड ग्राहकांनी काढली होती. एटीएममधील उर्वरित तीस लाखांची रोकड चोरी झाली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोलिस कॉस्टेबल व्ही. एम. बडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
तेच एटीएम फोडण्याची चौथी वेळ
लोणी व्यंकनाथ येथील स्टेट बॅंकेचे एटीएम मशीन यापूर्वी तीन वेळा फोडण्यात आले आहे. त्याच एटीएममध्ये चोरीची ही चौथी घटना आहे. शिवाय एटीएममध्ये मोठी रक्कम टाकण्यात आल्यानंतर त्याच रात्री चोरी झाल्याने या चोरीचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.