लंडन – ब्रिटनमध्ये मूळ लिबीया वंशाच्या व्यक्तीने शनिवारी संध्याकाळी केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये किमान तिघेजण ठार झाले, अशी माहिती ब्रिटनच्या दहशतवाद विरोधी विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. थेम्स व्हॅली पोलिसांनी हत्येचे प्रकरण म्हणून या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली होती.
मात्र या चाकू हल्ल्यामागील हेतू लक्षात घेता ही घटना म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे काउंटर टेररिझम पोलिसिंगचे ज्येष्ठ राष्ट्रीय समन्वयक डेप्युटी असिस्टंट कमिश्नर डीन हेडन यांनी म्हटले आहे. या घटनेचा तपास दक्षिण पूर्व काऊंटर टेररिझम पोलिसिंग (सीटीपीएसई)कडे सोपवण्यात येणार आहे, असेही थेम्स व्हॅली पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या चाकू हल्ल्यासंदर्भात शनिवारी रात्री एका 25 वर्षीय व्यक्तीला संशयावरून अटक करण्यात आली असून तो पोलीस कोठडीमध्येच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
बर्कशायर शहराच्या मध्यभागी असलेल्या फोर्बरी गार्डनमध्ये हा चाकू हल्ला झाला होता. रीडींग पार्क हा अत्यंत गजबजलेला भाग असून तेथे सकाळच्यावेळी हातात सुरा घेतलेल्या व्यक्तीने हल्ला केला. त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
अटक केलेला संशयित हा लिबीयाचा नागरिक असून तो ब्रिटनमधीलच रहिवासी आहे. या घटनेत हल्ला झालेल्या सर्वांबद्दल थेम्स व्हॅली पोलिसांची सहानुभुती आहे, असे थेम्स व्हॅली पोलिसांच्या चीफ् कॉन्स्टेबल जॉन कॅम्प्बेल यंनी म्हटले आहे.
अशा प्रकारचा हल्ला फार कमी वेळा झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता धोका नाही. या हल्ल्याचा कृष्णवर्णियांच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि गृहमंत्री प्रिती पटेल यांनी घेतली आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.