पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सण-उत्सवाच्या काळामध्ये आर्थिक रक्कम दिली जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना उत्सवात अडचण येत नाही. वर्षभरात नऊ सणांसाठी हा सणअग्रीम दिला जातो. गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सण अग्रिमसाठी तब्बल 25 कोटी 23 लाख रुपये देण्यात आले आहेत.
दिवाळी, ईद, ख्रिसमस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती आदी सणांसाठी या योजनेतून पैसे दिले जातात. गेल्या पाच वर्षांमध्ये 19 हजार 490 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 4 हजार 800 रुपये आहे, त्यांना सणअग्रिम दिला जातो. त्यामध्ये बहुतांश कर्मचारी हे दिवाळीला आगाऊ पैसे घेतात.
गेल्या काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही आगाऊ रक्कम देण्यास सुरूवात केली आहे. दरवर्षी तीन हजारांहून अधिक कर्मचारी या योजनेचा लाभ घेतात. दहा समान हप्त्यांमध्ये ही रक्कम पुन्हा भरावी लागते. ईद, ख्रिसमस, पारशी नववर्ष, संवत्सरी, जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनानिमित्तही सण अग्रिम रक्कम दिली जाते. यापूर्वी साडेबारा हजार रुपये रक्कम दिली जात होती. मात्र यावर्षीपासून 15 हजार रुपये देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी 5 कोटी रुपयांपर्यंत तरतूद करण्यात येते.
सण हे महिन्याभरामध्ये कोणत्याही तारखेला येऊ शकतात. त्यावेळी पगाराची तारीख नसते किंवा बऱ्याचदा पगार होण्यास खूप उशीर असतो. अशावेळी सण कसा साजरा करायचा ही समस्या कर्मचाऱ्यांपुढे असायची मात्र, आता सण कितीही तारखेला असला तरी उचल घेता येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या घरी आनंदात सण साजरे केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात सणाच्या दिवशी आनंदाचे वातावरण राहत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.