नवी दिल्ल्ली – सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही ईओडब्ल्यू कार्यालयात पोहोचली आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणी तिची चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेही पिंकी इराणीला समोर ठेवून चौकशी करण्यास तयार आहे. यापूर्वी जॅकलिन फर्नांडिसची आर्थिक गुन्हे शाखेत साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती.
जॅकलिन आणि पिंकी इराणी यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. जॅकलिन आणि पिंकी इराणी यांच्यात यावेळी जोरदार खडाजंगी झाल्याचे देखील समोर आले होते. पोलिसांच्या माहितीनुसार- पिंकी इराणीने सुकेश आणि जॅकलिनची भेट घडवून आणली होती. पिंकी इराणी म्हणाल्या की, सुकेश 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याची माहिती जॅकलिनला होती. तरीही जॅकलीनने त्याच्याकडून भेटवस्तू घेतल्या, मात्र जॅकलीने हे आरोप फेटाळून लावत पिंकी खोटे बोलत असल्याचे म्हंटले आणि आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे देखील स्पष्ट सांगितले.. पिंकी ही सुकेशची खूप दिवसांपासूनची सोबती होती.
ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलिन फर्नांडिसला 5.71 कोटी रुपयांच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता आणि त्याने या प्रकरणातील सहआरोपी पिंकी इराणीच्या माध्यमातून अभिनेत्रीला या भेटवस्तू दिल्या होत्या. या भेटवस्तूंव्यतिरिक्त चंद्रशेखरने सहआरोपी अवतार सिंग कोचर यांच्यामार्फत फर्नांडिसच्या जवळच्या नातेवाईकांना सुमारे १.३ कोटी रुपय दिल्याचे सांगितले होते.कोचरला आंतरराष्ट्रीय हवाला ऑपरेटर म्हणून देखील ओळखले जाते.
नोराच्या चौकशीनंतर आणखी काय धागेदोरे मिळतात याची प्रतीक्षा अधिकाऱ्यांना आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी आता जॅकलिन नंतर नोरालादेखील चौकशीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय यामध्ये बॉलिवूडमधील आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याची देखील चाचपणी तपास अधिकारी करणार असल्याची चर्चा आहे.