पिंपरी – मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्याची कार्यवाही प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. महापालिकेशी संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आजअखेर 2 हजार 359 नोंदी आढळल्या आहेत. त्यासाठी विविध विभागातील 5 लाख 83 हजार 832 फाइली तपासण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1948 ते 1967 या कालावधीतील जन्म-मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके तसेच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करआकारणी नोंद रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत.
त्यानुसार महापालिकेतील विविध विभागाच्या प्रमुखांनी सन 1948 ते 1967 या कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची छाननी करून अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी शोधल्या आहेत. त्यामध्ये 2 हजार 359 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.