सातारा – राज्यातील सरकार घटनाबाह्य असून मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार निश्चितच अपात्र ठरुन हे सरकार कोसळेल, असा आशावाद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. सरकारमधील मंत्री व आमदारांकडून सध्या लूट सुरु असून याबाबत जनतेत प्रचंड असंतोष आहे.
जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आ. शिंदे म्हणाले, “”राज्यातील सरकार घटनाबाह्य असून चुकीच्या पध्दतीने नियम डावलून या सरकारची निर्मिती झाली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकार कोसळणार असल्याने सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे हसू पळाले आहे. मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याने ते अपात्र ठरुन सरकार कोसळणार आहे.” सत्ताधारी गटातील काही आमदारांनी प्रशासनाला नाहक त्रास सुरु केला आहे.
काहींनी जिल्हा लुटण्याचे उद्योग सुरु केले आहेत. आम्ही पण सत्तेत होतो. मात्र, आम्ही कधी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अरेरावी केली नाही. आत्ता मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विरोधी आमदारांची कामेच होऊ नयेत यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र, चुकीच्या पध्दतीने आलेले सरकार लवकरच कोसळावे अशी अपेक्षा आता प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही झाल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षातील लोकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार असून केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मला काही जण असरानी म्हणत आहेत. मात्र, मी त्यांना यापूर्वीच गब्बर म्हणालो आहे. काही लोकांना आता कलाकारांची नावे घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात आ. शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. लोकांना आता सर्व काही समजत असून निवडणुका लागू द्या, कोणाची ताकद किती आहे हे जनताच दाखवून देईल, असा इशारा आ. शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
राष्ट्रवादी फुटण्याच्या केवळ वावड्या
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी मजबूत आहे. पक्षात फूट पडेल, राष्ट्रवादीत भूकंप होईल अशा वावड्या उठवल्या जात आहेत. राष्ट्रवादीची ताकद आगामी सर्वच निवडणुकांमध्ये दिसून येणार असून राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार उठाव होत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, काहींच्या दबावामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी टीका आ. शशिकांत शिंदे यांनी केली.