नवी दिल्ली – ग्राहकांकडन मागणी असली तरी पुरवठा पुरेसा नसल्यामुळे डिसेंबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत म्हणजे कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या वाहनांच्या विक्रीत 13 टक्क्यांची घट झाली आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यफॅक्चरर्स या वाहन उत्पादकाच्या संघटनेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यात 2,19,421 प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 2,52,998 इतक्या प्रवासी वाहनांची विक्री झाली होती.
डिसेंबर महिन्यात दुचाकी विक्री 11 टक्क्यांनी कमी होऊन 10,06,062 युनिट्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसच्या काळातही 11,27,917 दुचाकींची विक्री झाली होती.
मोटर सायकलची विक्री दोन टक्क्यांनी कमी 7,26,587 युनिट झाली आहे. स्कूटरची विक्री 24 टक्क्यांनी कमी होऊन 2,46,080 इतकी झाली आहे. डिसेंबर महिन्यात व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत मात्र वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण वाहन विक्रीत 22 टक्क्यांची घट होऊन या महिन्यात 46,36,549 वाहनांची विक्री झाली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये भारतामध्ये वाहनांची विक्री जास्त होते. कारण या महिन्यात दिवाळी, दसरा यासारखे सण असतात. मात्र या वर्षी सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे आणि ग्राहकांची क्रयशक्ती कमी असल्यामुळे या तीन महिन्यात वाहनांची विक्री कमी झाली आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा नजीकच्या भविष्यात कमी होण्याची शक्यता मावळली आहे.
त्यामुळे आगामी काळातही वाहन विक्रीत वाढ होण्याची शक्यता नाही असे या संघटनेने म्हटले आहे. असे असले तरी बहुतांश वाहन कंपन्या नवी उत्पादने विकसित करीत आहेत किंवा सादर करीत आहेत. काही महिन्यानंतर या क्षेत्रातील परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून वाहन वितरकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. ओमायक्रॉनचा परिणाम कमी झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी आम्हाला आशा आहे असे या संघटनेने म्हटले आहे.