कराडसह साताराजिल्हा हादरला; जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 33 वर
86 जण विलगीकरण कक्षात
सातारा : (प्रतिनिधी) करोनाबाधितांची संख्या एकाच दिवसात वाढल्यामुळे सातारा जिल्हा हादरून गेला आहे. एकाच दिवसात शनिवारी कराडमधील रुग्णालयात पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता 26 झाली आहे. बाधित रुग्णाच्या निकट सहवासतील म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 7 व बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 5 जण असे 12 जण करोनाबाधित (कोविड-19) असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. प्राथमिक तपासण्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 33 झाली आहे. त्यापैकी 3 करोनाग्रस्त (कोविड 19) मुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सोडले आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या 3 नागरिकांचे अहवाल अनिर्णित असल्याचे बी. जे. वैद्यकिय महाविद्यालयाने कळविले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तसेच 24 एप्रिल रोजी रात्री उशिरा साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 23 संशयितांना तर आज 17 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमद्ये 8, उपजिल्हा रुग्णालयात 24 व ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 14 अशा एकूण 86 संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.