महापालिकेला सेवा देण्यास बीव्हीजी कंपनीचा नकार ः मुख्यालयाकडे बोट
पुणे : महापालिका मुख्य इमारतीतही “108′ ही रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून द्यावी, यासाठी महापालिकेने बीव्हीजी कंपनीला पत्र पाठवून विनंती केली होती.
मात्र, ही सेवा केवळ हॉस्पिटलसाठी असल्याचे सांगत, ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास कंपनीने नकार कळवला आहे. पालिका मुख्य कार्यालयात सुमारे पाच हजार कर्मचारी कार्यरत असून, दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकही येतात.
अशा स्थितीत एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास तातडीची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ही रुग्णवाहिका उभी केली जाणार आहे. एखादी वैद्यकीय स्थिती उद्भवल्यास संबंधिताला तातडीची आरोग्य सेवा देण्याची व्यवस्था महापालिकेत नाही. अशा वेळी पालिकेच्या रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावून संबंधितास उपचारासाठी नेले जाते.
त्यामुळे पालिकेतही कायमस्वरूपी 108 सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महिला आणि बालकल्याण समितीने जुलै 2019 मध्ये झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार, आरोग्य विभागाने मालमत्ता विभागाशी चर्चा करून या रुग्णवाहिकेसाठी जागा निश्चित केली होती.
मात्र, ही सेवा केवळ रुग्णालयांसाठी असल्याचे सांगत बीव्हीजी आपले हात झटकले आहेत. तसेच समाधान करण्यासाठी “पालिकेचे पत्र बीव्हीजीच्या मुख्यालयाला पाठवले असून, त्यांच्याकडून मान्यता मिळाली, तर रुग्णवाहिका देण्यात येईल,’ असे कळवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तूर्तास ही रुग्णवाहिका उपलब्ध होणार नाही, हे स्पष्ट आहे.