नगर – नगरमधून अलीकडच्या काळात सुमारे 101 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणाचा कायदेशीर तपास करून मुलींना पळविणाऱ्या आरोपींनवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोटरी प्रियदर्शनी आणि रोटरी मेन क्लबच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.
रोटरी क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल गीता गिल्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा ऍड.नीलमणी गांधी, रोटरी मेन क्लबचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव व सदस्या यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून निवेदन दिले. याबाबत गीता गिल्डा म्हणल्या, नगरमधून सुमारे 101 मुली बेपत्ता होणे ही खूप मोठी चिंताजनक बाब आहे. तसेच शहरात सातत्याने महिला व मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत.
काही दिवसांपूर्वी बागडपट्टी येथेही अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासंदर्भात पोलीस खात्याकडून काय कारवाई होत आहे? असा प्रश्न उपस्थित करून गीता गिल्डा यांनी मुलींना पळवणाऱ्या आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली. रोटरीनगर मध्ये बेटी बचाव बेटी पढाव याबद्दल जागृती आणि त्या संदर्भातील उपक्रम राबवत आहे. परंतु यापुढेही जाऊन आता बेटी सुरक्षा ही हाती घेतली आहे.
आता यापुढे बेटी बचाव बेटी पढाव आणि बेटी सुरक्षा यावर रोटरी क्लब काम करणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, मुलींवरील अत्याचारातील आरोपी व पळवून नेणाऱ्या आरोपीचा तपास लवकरात लवकर व्हावा, यासाठी पोलीस निरीक्षकांकडे हा तपासा दिला जातो. आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी 376 कलम, अंतर्गत गुन्हा व पोस्को कायदा लावण्यात आल्याचे सांगितले.