पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) -महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळांची मैदाने महापालिकेकडून नागरिक, संघटना, संस्था, मंडळे, कंपन्यानी भाड्याने घेतात. अशा ठिकाणी शून्य कचरा कार्यप्रणालीचा अवलंब करून झिरो वेस्ट कार्यक्रम राबविल्यास या वापरकर्त्यांना महापालिकेच्या वतीने भाड्यामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवार (दि.18) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये संपूर्ण देशात अव्वल येण्यासाठी महापालिकेमार्फत आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह, खेळाचे मैदान येथे शून्य कचरा मानक कार्यप्रणालीचा अवलंब करून झिरो वेस्ट कार्यक्रम राबविण्यासाठी महापालिकेच्या वतीने विस्तृत स्वरुपात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिक, संघटना, संस्था, मंडळे तसेच कंपन्यानी महापालिकेचे सभागृह, प्रेक्षागृह तसेच खेळांची मैदाने महापालिकेकडून भाड्याने घेतल्यानंतर या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून झिरो वेस्ट उपक्रम राबविल्यास त्यांना 10 टक्के भाडे आकारणीत सवलत देण्यात येणार आहे. प्रभाग क्र. 13 मधील यमुनानगरमध्ये लाइट हाऊस प्रकल्पाचे आवश्यक स्थापत्य विषयक काम करण्यासाठी 29 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय पदव्युत्तर संस्थेच्या शस्रक्रिया विभागासाठी आवश्यक हार्मोनिक स्कालपेल खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासह तरतूद वर्गीकरण तसेच महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विषयांना प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.
300 घंटागाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस
महापालिकेतील आठ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी बोनस देण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त 300 कंत्राटी कर्मचाऱ्यांना 30 हजार रूपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.