पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या, मुंबई यांच्यामार्फत राज्यातील दिव्यांगांना राष्ट्रीय महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजना, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरते दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेइकल) विविध योजना राबविण्यात येतात. यात आता मोबाईल शॉप ऑन व्हेइकल या योजनेसाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून १० कोटीचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहने उपलब्ध करून देण्यासाठी १५ कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयान्वये महामंडळास सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी योजनेच्या लेखाशीर्षातंर्गत एकूण रुपये ५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षात अनिवार्य तरतुदीकरिता निश्चित केलेल्या सुधारीत अर्थसंकल्पीय अंदाजाच्या मर्यादेत १० कोटी इतका निधी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळास वितरीत करण्याची बाव शासनाच्या विचाराधीन होती. अनुदान वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. निधी खर्च झाल्यावर त्याबाबतचे विवरण व उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ शासनाकडे सादर करावे लागणार आहे.