पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपा नेत्यांनी शासनाचे धान्य स्वत:चे नावे वाटून चमकोगिरी करण्याचा जो दुर्दैवी प्रकार चालविला होता त्याला शासनानेच खिळ घातल्याने भाजपा नेत्यांचा तिळपापड झाला आहे. या प्रकारानंतरही नामदेव ढाके यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून टीका करण्याचा प्रकार सुरू आहे. ढाके यांचे हे दुर्दैव असून “गिरे तो भी टांग उपर’ या म्हणीचाच प्रत्यय भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
याबाबत काटे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, शासनाकडून रेशनिंग दुकानावर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या धान्य वाटपामध्ये भाजपाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करून पक्षाच्या व स्वत:च्या नावावर हे धान्य वाटप करण्यास सुरुवात केली होती. पक्षाचे चिन्ह आणि स्वत:चे नाव वापरून चमकोगिरी व सर्वसमान्य नागरिकांची फसवणूक सुरू केली होती. याबाबत आम्ही शासनाकडे तक्रार केल्यानंतर शासनाने तातडीने कारवाई करत भाजपा नेत्यांच्या चमकोगिरीला खिळ घालत चपराक दिली.
शासनाने धडा शिकविल्यानंतरही महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते टीका करीत आहेत. ही टीका त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरेच कोणीतरी निशाना साधत आहे. हे ढाके यांचे दुर्दैव आहे. करोनासारख्या महामारीमध्येही भाजपा नेत्यांना चमकोगिरी सुचते यासारखे दुसरे कोणतेच दुर्दैव नाही. शहरातील अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते स्वखर्चाने गरिबांना मदत करत आहेत, भाजपाने या लोकांकडून धडा घ्यावा व स्वखर्चाने गरिबांना मदत करावी, असेही या निवेदनात काटे यांनी म्हटले आहे.