नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोविशिल्ड या पहिल्या मेड इन इंडिया कोविड लसीच्या आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केला आहे.
“वचन दिल्याप्रमाणे, वर्ष 2020 च्या समाप्तीपूर्वी, सिरम इस्टीट्युट ऑफ इंडियाने आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी अर्ज केला असून यामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचू शकतील, असे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोविशिल्ड ही ऍस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड यांनी विकसित केलेली लस आहे आणि एसआयआय या लसीचे उत्पादन करणार आहे.
यापूर्वी, फायझर ही भारतात आपात्कालीन लसीचा वापर करण्यासाठी अर्ज करणारी पहिली कंपनी बनली होती आणि त्यांनी या लसी आयात करण्याची परवानगी मागितली होती. इंग्लंड आणि अमेरिका फायझरच्या लसीद्वारे लसीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी तयार आहेत.
नोव्हेंबरच्या अखेरच्या सप्ताहात, “सीरम’ने जाहीर केले होते की, वर्ष 2020 संपण्यापूर्वी ते लसीचा आपात्कालीन वापर करण्यासाठी सज्ज राहतील. तो शब्द त्यांनी पाळला आहे. पूनावाला म्हणाले होते की “सिरम’ क्लिनिकल चाचण्यांचा डेटा भारतीय औषध नियंत्रण संस्थेकडे (डीसीजीआय) सादर करण्याच्या विचारात आहे आणि आपत्कालीन वापरासाठी परवानगी घेईल. ऍस्ट्रॅजेनेका लस रोलआउटमध्ये कोणताही विलंब होणार नाही कारण कार्यक्षमता प्रस्थापित करण्यासाठी चाचण्या पुरेसे आहेत आणि त्यामुळे युरोपमधील आपत्कालीन वापराच्या परवानगीवर परिणाम होणार नाही.